भारतात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झालं आहे. असंघटित आणि दररोज काम करून उदरर्निवाह चालवणाऱ्यांचा प्रश्न उपस्थित होतं होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी केली.
पुढील तीन महिने कुणाला काय मिळणार मदत?
करोनाचा मुकाबला करत असतानाच देशातील सर्वच घटकातील नागरिकांना मदत करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेजची घोषणा केली.
१)करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्त्यासह सध्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० हजारांचं विमा सुरक्षा कवच. देशातील २० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार.
२)पंतप्रधान गरीब अन्न योजनेतंर्गत देशातील ८० कोटी गरिबांना रेशन पुरवणार. प्रत्येकाला महिन्याला ५ किलो गहू, तांदूळ आणि १ किलो डाळ पुढील तीन महिने मोफत देणारं.
३) पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करणार. याचा देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार.
४)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना १८२ रूपयांऐवजी प्रति दिन २०२ रुपये मजुरी मिळणार.
५) ३ कोटी गरीब, वृद्ध, दिव्यांग आणि गरीब विधवांना पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत दोन टप्प्यात १००० मिळणार.
६) जनधन खातेधारक महिलांना प्रति महिना ५०० रुपये मिळणार. ही रक्कम पुढील तीन महिने मिळणार.
७)उज्जला योजनेतंर्गत दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या देशातील ८ कोटी महिलांना पुढील तीन महिने गॅस सिलिंडर मोफत केंद्र सरकार मोफत पुरवणार.
८)देशामध्ये ६३ लाख बचत गट सुरू आहेत. या बचत गटांना १० ऐवजी २० कर्ज मिळणार. यामुळे ७ कोटी कुटुंबांना लाभ.
९)ज्या उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५ हजारांपेक्षा कमी आहे, त्या संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा ईपीएफ हफ्ता पुढील तीन महिने सरकार भरणार. यात कंपनीचाही हिस्साही सरकार भरणार आहे.
१०) ईपीएफमध्ये असलेल्या रकमेतून कामगारांना ७५ टक्के रक्कम नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येणार.
११)बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी ३१ हजार कोटींचा निधी. यात साडेतीन कोटी मजुरांची नोंद आहे. या निधीतून कामगारांना मदत देण्याची सर्व राज्य सरकारांना निर्देश केंद्रानं दिले आहेत.
१२)बँक, बँक मित्र, एटीएम सेवा या सगळ्यांना लॉकडाउनमधून वगळण्यात आलं आहे. खात्यात जमा झालेली रक्कम लाभार्थ्यांना एटीएममधून काढता येणार आहे. त्याचबरोबर घरी येणाऱ्या बँक मित्राच्या माध्यमातूनही मिळवता येणार आहे.