करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक थांबवण्यासाठी उशिराने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचं दृश्य देशभरात दिसत आहे. उद्रेक झाल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी करोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. देशात दररोज चार लाखांच्या आसपास करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, गेल्या चार दिवसांपासून समोर येणारे मृत्यूंचे आकडे झोप उडवणारे आहेत.

देशात करोनाचा प्रकोप सुरू असल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेनं सौम्य ठरवली असून, देशात दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. गेल्या २४ तासांतील परिस्थितीही अशीच असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने चिंतेत भरच टाकली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.

‘मोदी सरकारच्या बेजबाबदार वर्तनानं ओढवून घेतलेलं संकट”

जगप्रसिद्ध ‘दी लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रातील नियतकालिकाने करोना परिस्थिती हाताळण्यावरून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘दी इन्स्टिट्यूट फॉर दी हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेने दिलेल्या माहितीच्या संदर्भाचा उल्लेख करून ‘दी लॅन्सेट’च्या संपादकीयात असे म्हटले आहे, की १ ऑगस्टपर्यंत भारतात दहा लाख बळी जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर ते मोदी सरकारने बेजबाबदार वर्तनाने ओढवून घेतलेले संकट असेल. भारताने आता या पेचप्रसंगातून धडा घेण्याची गरज असून त्यासाठी सरकारला आपल्या चुका आधी मान्य कराव्या लागतील. देशाला एक जबाबदार नेतृत्व असायला हवे. पारदर्शकता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या प्रतिसादात पारदर्शकता असायला हवी, असे ‘लॅन्सेट’ने म्हटलेलं आहे.

Story img Loader