मास्क न घातल्याने पोलिसांनी सीआरपीएफ जवानाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी जवानाला फक्त मारहाण केली नाही तर नंतर साखळीने बांधून ठेवलं होतं. मास्क न घालता रस्यावर फिरत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सचिन सावंत असं या जवानाचं नाव असून एका ट्विटर युजरने त्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोत सचिन सावंत यांना पोलीस ठाण्यात साखळीने बांधून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून हे अत्यंत अमानवीय असून जवानाला अशी वागणूक देणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सावंत सुट्टीवर असून बेळगावला आपल्या घरी आले होते. २३ एप्रिल रोजी सचिन सावंत आपली दुचाकी स्वच्छ करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना हटकलं आणि मास्क का घातलं नाही अशी विचारणा केली. सचिन सांवत आपण सीआरपीएफ कमांडो आहोत असं सांगत असतानाही पोलीस त्यांना मारहाण करत होते. त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. यानंतर पायात साखळी बांधून अनवाणी पोलीस ठाण्यापर्यंत चालत नेण्यात आलं.

पोलिसांनी मात्र जवानाने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल गैरवर्तवणूक केल्याचा दावा केला आहे. तसंच पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्यानेच अटक केली असल्याचं म्हटलं आहे. सीआरपीएफने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं असून कर्नाटक पोलीस प्रमुखांसमोर नेलं असून प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader