करोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले आहे. दरम्यान देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे.
हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, “इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली आहे”.
We do not anticipate a very worst type of situation in our country like many other developed countries but still we have prepared the whole country for the worst situation: Dr Harsh Vardhan, Union Health Minister #COVID19 pic.twitter.com/TE8A7sviJt
— ANI (@ANI) May 9, 2020
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ३३२० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ९५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३९ हजार ८३४ रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले १७ हजार ८४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९८१ जणांचा समावेश आहे.
आणखी वाचा- Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 3 हजार 320 नवे रुग्ण, 95 मृत्यू
करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.