माकडांनी संशयित करोना रुग्णांच्या चाचणीचे नमुने घेऊन जाणाऱ्या एका प्रयोगशाळा तंत्रज्ञावर हल्ला केल्याची एक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे माकडांनी यावेळी त्याच्या हातातून संशयित करोना रुग्णांचे नमुने खेचून घेत पळ काढला. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मेडिकल कॉलेजच्या आवारात हा प्रकार घडला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये करोनाची लागण झाल्याचा संशय असणाऱ्या तिघांचे नमुने घेण्यात आले होते. पण नमुन्यांची चाचणी होण्याआधीच माकडांनी हे नमुने पळवले आहेत. डॉक्टरांनी यानंतर संबंधित संशयितांचे नव्याने नमुने घेतले आहेत.
धक्कादायक म्हणजे एक माकड झाडावर जाऊन नमुने गोळा करण्याचं किट चावत होता. यावेळी किटमधील काही गोष्टी तिथेच जमिनीवर खाली पडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यांनी मेरठचे जिल्हाधिकारी अनिल ढिंगरा यांना यासंबंधी विचारलं असता आपल्यापर्यंत असा कोणताही व्हिडीओ आला नाही, पण या घटनेची चौकशी करु असं सांगितलं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात माकडांचा वावर आहे. पण माकडांकडे करोना किट असल्याने स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. माकडं जवळच्या वस्त्यांमध्ये फिरत असल्याने करोनाचा फैलाव होईल अशी चिंता त्यांना सतावत आहे.