गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुक्त असलेल्या गोव्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण आढळले असल्याने खबरदारी घेतली जात आहे. गोव्यात करोनाचे १८ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे काही प्रवासी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“सध्या राज्यात करोनाचे १८ रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण राज्यात प्रवेश करत इतर लोकांमध्ये जाण्यापूर्वीच सापडले आहेत,” असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. “राजधानी ट्रेनने प्रवास करणारे अनेक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोव्यात या ट्रेनला थांबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून मडगाव रेल्वे स्थानकावर ही ट्रेन थांबणार नाही,” अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राजधानी एक्स्प्रेसने शनिवारी २८० तर रविवारी ३६८ प्रवासी गोव्यात पोहोचले असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी थिरुअनंतपुरम ते दिल्लीदरम्यान धावणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस मात्र मडगाव रेल्वे स्थानकावर थांबेल असं त्यांनी सांगितलं आहे.

“निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील एकही प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचं समोर आलं आहे. सोबतच मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही फार कमी आहे,” अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून रेड झोनमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांची तपासणी केला जाणार असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

करोना रुग्णांमुळे गोव्यात कुठेही समूह संसर्ग झाला नसल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तसंच २१ मे रोजी होणारी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.

Story img Loader