देशात गेल्या २४ तासत ६३८७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून १७० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५१ हजार ७६७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ४३३७ इतकी झाली आहे. सध्या देशात करोनाचे ८३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान ६४ हजार ४२५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलग सहाव्या दिवशी रुग्णसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते मार्चमध्ये ७.१ टक्के होते, तर आता ते ४१.६ टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगभरात सर्वात कमी असून ते ३.३ टक्कय़ांवरून २.८७ टक्कय़ांवर आलेले आहे, तर जगभरात मृत्यूचे सरासरी प्रमाण ६.४ टक्के आहे. रुग्णांचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. जगभरात एक लाख लोकांमध्ये करोनाचे ६९.९ रुग्ण आहेत, तर भारतात केवळ १०.७ रुग्ण आढळले आहेत. देशातील एक लाखामागे मृत्यूचे प्रमाण ०.३, तर जगभरात ४.४ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये करोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या कमी आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असली, तरी त्याबाबत निष्कर्ष काढता येत नाही. बीसीजी लस, प्रतिकारशक्ती अधिक असणे वगैरे अनेक मुद्दे सांगितले जात आहेत. पण हे निव्वळ अंदाजच आहेत. मात्र, खूप आधीपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यावर भर देण्यात आला. रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. या प्रतिबंधात्मक उपायांमुळेही भारतात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे मत केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. करोनाची साथ आटोक्यात आल्याचेही केंद्राचे म्हणणे नाही, असेही अगरवाल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown spike of 63 new covid19 cases and 170 deaths in the last 24 hours sgy