करोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून स्पेनमध्ये २४ तासांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्पेनमध्ये करोनाचे दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपमध्ये करोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये इटलीनतंर स्पेनचा क्रमांक असून मोठा फटका बसला आहे. स्पेनमधून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील करोनाबाधितांची संख्या ७७५३ वर पोहोचली असून यामधील २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने स्पेनने काळजी घेण्यास सुरुवात केली असून इटलीपाठोपाठ प्रवासबंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. तसंच दोन आठवडय़ांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कामावर जाणे, वैद्यकीय चाचणी आणि अन्न खरेदी याशिवाय कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

स्पेनमध्ये शनिवारी सगळा देश बंद ठेवण्याची वेळ आली. प्रादेशिक ठिकाणी या दोन्ही देशांना करोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असताना हा निर्णय घेण्यात आला. करोनाशी लढा देण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात असून बस आणि ट्रेन्सची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त करण्यात आली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांच्या पत्नीनंतर आता स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. आणीबाणी जाहीर केल्यानंतर काही वेळातच यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने यासंबंधी निवेदन जारी करत पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती सध्या ठीक असून दोघेही सरकारी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखेखाली असल्याचं सांगण्यात आलं.

स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी अनेक आपत्कालीन उपाय देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केले. त्यांनी सात तास मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सँचेझ यांचे सोशालिस्ट व विरोधी युनायटेड वुई कॅन यांच्यातील संघर्ष करोनाग्रस्त परिस्थितीतही चालूच आहे त्यामुळे बैठक लांबल्याचे समजते. आता फक्त आरोग्य हा अग्रक्रम राहील तसेच अन्न व औषधे खरेदी, लहान मुले व तरुणांची शुश्रुषा, बँक व्यवहार यासाठी घरातून बाहेर पडता येईल. सर्व रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, शाळा, विद्यापीठे, अनावश्यक किरकोळ विक्री केंद्रे बंद करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

माद्रिद व बार्सिलोनात बार, रेस्टॉरंट, अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली आहेत. या दोन्ही वर्दळीच्या शहरात आता शांतता असून सामाजिक अंतर राखणे हाच एकमेव उपाय असल्याचे चीनच्या अनुभवातून स्पष्ट झाले होते. काही हॉटेल्समध्ये तात्पुरते दवाखाने सुरू करण्यात आले असून सुपरमार्केट सुरू असल्याने तेथे गर्दी होती. विमानतळे खुली असली तरी स्पेनकडे येणाऱ्या विमानांची संख्या आता घटली आहे. यापूर्वी स्पेनमध्ये १९७० च्या दशकात व नंतर २०१० च्या हवाई नियंत्रक अधिकाऱ्यांच्या संपात आणीबाणी पुकारण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus more than 100 deaths in last 24 hours in spain sgy