न्यूझीलंडमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध पाळले जात आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल आणि कॅफे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नियमांचे कडेकोटपणे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांच्या सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीचा फटका खुद्द पंतप्रधानांनाच बसल्याची घटना समोर आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात सरकारने कॅफे आणि हॉटेल मालकांना घातलेल्या निर्बधांमुळे आर्डेन आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना कॅफेमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना वेलिंग्टनमध्ये शनिवारी घडली.
जसिंडा या त्यांचा जोडीदार क्लार्क गेफोर्ड आणि काही मित्रांबरोबर वेलिंग्टनमधील ऑलिव्ह या प्रसिद्ध कॅफेमध्ये गेले होते. मात्र न्यूझीलंडमधील नवीन नियमांनुसार एका ठराविक वेळेला ठराविक संख्येमध्येच ग्राहकांना कॅफे किंवा हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा असं सरकारने सांगितलं आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांअंतर्गत मर्यादित ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळेच नियमांनुसार हॉटेलमध्ये पूर्ण क्षमतेने ग्राहक असल्याने पंतप्रधानांसहीत त्यांचा पार्टनर आणि मित्रांच्या हाती निराशाच लागली. यासंदर्भात क्लार्क गेफोर्ड यांनीच ट्विटरवरुन माहिती दिली आहे. या दोघांना कॅफेबाहेर पाहिलेल्या एका व्यक्तीने ट्विटवरुन घडलेला घटनाक्रम सांगितला. त्याला उत्तर देताना “यासाठी मी जबाबदार आहे. मी आधीच बुकींग केलं नव्हतं. आम्ही निघून गेल्यावर थोड्यावेळाने त्यांच्या हॉटेलमधून एकजण आमचा पाठलाग करत आला आणि जागा रिकामी झाल्याचे आम्हाला सांगितले. त्यांची सेवा ए प्लस दर्जाची आहे,” असं गेफोर्ड ट्विटमध्ये म्हणाले.
I have to take responsibility for this, I didn’t get organized and book anywhere. Was very nice of them to chase us down st when a spot freed up. A+ service.
— Clarke Gayford (@NZClarke) May 16, 2020
न्यूझीलंडमध्ये दीड हजारहून कमी कोरनाग्रस्त अढळून आले आहे. देशात करोनामुळे २१ जणांचा मृत्यू (१८ मे पर्यंतची आकडेवारी) झाला आहे. तर आतापर्यंत १४०० हून अधिक जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याने मागील मंगळवारपासून (१२ मे) देशामध्ये हॉटेल आणि कॅफे सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले आहेत. “कॅफेमध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही टेबल रिकामे नाही,” हे पंतप्रधानांना सांगताना मालकाला अगदीच अवघडल्यासारखे झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.