करोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरातील ७ लाख ८७ हजारहून अधिक जणांना कोरनाची लागण झाली आहे. तर जगभरात या विषणूची लागण झाल्याचे मरण पावलेल्यांची संख्या ३७ हजारहून अधिक झाली आहे. युरोपीयन देशामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. युरोपमधील देशांना कोरनाचा चीनपेक्षा अधिक फटका बसला आहे. अशातच आता ब्रिटनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका वयस्कर महिलेचा करोनाची लागण झाल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी मत्यू झाला. या महिलेच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या एकाच कुटुंबातील १७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाची लागण मृत व्यक्तीच्या शरीरामधूनही होत असल्याचे निष्पण्ण झाला असून आता हे कुटुंब नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीला ब्रुक्स या ८६ वर्षीय महिलाचा ९ फेब्रुवारी रोजी मत्यू झाला. या महिलेला करोनाची लागण झाली होती. या महिलेवर काही आठवड्यांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा ब्रिटनमध्ये लॉकडाउन करण्यात आलं नसल्याने या महिलेच्या अनेक नातेवाईकांनी तिच्या अंत्यसंस्काराला हजेरील लावली होती. त्यानंतर काही दिवसांनंतर १३ मार्च रोजी मृत महिलेची ६५ वर्षीय भाची सुझॅन नेल्सन आजारी पडली. सुझॅनचाही काही दिवसांमध्ये मृत्यू झाला. या महिलेला करोना झाल्यानेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुझॅनची प्रकृती ठणठणीत असताना तिचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शीलाच्या अंत्यसंस्कारादरम्यान सुझॅनसहीत अन्य १६ जणांना करोनाची लागण झाली आहे.

पश्चिम मीडलॅण्डमधील एका सॅण्डवीचच्या दुकानाच्या मालकीण असणाऱ्या सुझॅन यांचा मृत्यूही त्याच रुग्णालयामध्ये झाला तिथे तिच्या आत्याचा मृत्यू झाला होता. सुझॅन शिला यांच्या अंत्यसंस्कारानंतर आठवड्याभरात आजारी पडली. त्यानंतर १६ मार्च रोजी तिला बर्मिंगहम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयामध्ये दाखल कऱण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी सुझॅनचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. “तिला सतत खोकला येत होता, तिला श्वास पुरत नव्हता. करोनाची सर्व लक्षणं तिच्या दिसत होती,” अशी माहिती सुझॅन यांचा ४२ वर्षीय मुलगा कार्ल याने दिली आहे.

आता सुझॅन यांची ३४ वर्षीय मुलगी अमांडा ही तिच्या वडीलांबरोबर क्वारंटाइनमध्ये राहत आहे. आपल्या कुटुंबातील अन्य एखाद्या व्यक्तीचा करोनामुळे जीव जाईल अशी भिती अमांडाला वाटत आहे. “आमच्या कुटुंबातील आणखीन एक सदस्य रुग्णालयामध्ये दाखल आहे. ती व्यक्तीही या आजारामधून बरी होण्याची शक्यता कमीच आहे,” अशी भीती अमांडाने व्यक्त केली आहे.

“माझ्या २१ वर्षीय चुलत भावापासून ते माझ्या ८८ वर्षीय काकांपर्यंत अनेक जणांमध्ये करोनाची लक्षणं दिसून येत आहे. अंतसंस्काराला गेलेल्या आम्हा सर्वांना याचा संसर्ग झाला आहे. आमच्यापैकी एकही व्यक्ती यामधून सुटलेला नाही. आमच्या कुटुंबातील १७ जणामध्ये करोनाची लक्षणं दिसून येत आहेत. या आजारामुळे माझ्या आईचे निधन झालं आहे. आमचं कुटुंब या आजाराने उद्धवस्त केलं आहे,” अशा शब्दांमध्ये अमांडाने आपले दुख: व्यक्त केलं. आमच्या कुटुंबाबरोबर झालं ते कोणाबरोबरही होऊ नये असं कार्ल सांगतो. सर्वांनी सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करा. घरीच थांबा आणि सुरक्षित राहा, वेडेपणा करु नका असं आवाहन आता हे कुटुंब इतरांना केलं आहे.

Story img Loader