भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात २४ तासांमध्ये ३ लाख ३२ हजार करोना रुग्ण आढळले आहेत. हा एका दिवसातील उच्चांक असून भारतातील करोना बाधित रुग्णांची संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजारांवर पोहचली आहे. भारतामधील करोना परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. असं असतानाच भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी संस्थेचं कौतुक केलं जात आहे.

नक्की वाचा >> भारतातील करोना परिस्थिती पाहून पाकिस्तानीही हळहळले; #PakistanstandswithIndia पाकमध्ये Top Trend

एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. “आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. करोना आणि त्याचा भारतींयांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. या करोना महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणासंदर्भात आम्हाला चिंता आहे. भारतामध्ये सध्या अनेकांना करोनासंदर्भातील संकटाला तोंड द्यावं लागत आहे. सध्याच्या या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो,” असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.

“मी फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. सध्याची परिस्थिती गंभीर आहे याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. यामध्ये तुमच्या नियोजनात आमची काही अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळेच आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू,” असंही या पत्रात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानमधून पाठवण्यात येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व सामान घेऊन येणार असून भारताकडून केवळ परवानगी हवी असल्याचं म्हटलं आहे. “आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नकोय. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू. आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील,” असं पत्रात नमूद केलं आहे.

“तुम्ही आम्हाला केवळ भारतात येण्याची परवानगी द्या आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळेल यासंदर्भातील सूचना करा. तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमच्या टीम पाठवण्यास तयार आहोत. तुमच्या सांगण्यानुसाच आम्ही काम करु, आम्हाला केवळ परवानगी द्या. सध्याच्या संकटाच्या प्रसंगामध्ये मदत करण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला शक्य असेल त्या माध्यामातून आम्ही तुम्हाला मदत करु इच्छितो. आमच्या मदतीमुळे भारतीय नागरिकांना दिला मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत,” असंही एधी यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

मोदींनीही दिली होती एक कोटींची मदत…

पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमध्ये एधी फाउंडेशननेच केली होती. गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.

Story img Loader