ओडिशामध्ये करोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला आहे. ही व्यक्ती १० दिवसांपूर्वी इटलीहून भारतात परतली आहे. करोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये चीननंतर इटलीचा समावेश आहे. इटलीहून परतलेल्या या व्यक्तीने विलगीकरणापासून वाचण्यासाठी अनेकदा गेस्ट हाउस बदलले असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर भुवनेश्वरला परत येईपर्यंत १२९ लोकांच्या संपर्कात आला आहे. हा खुलासा झाल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

करोनाची लागण झालेल्या या ३३ वर्षीय व्यक्तीवर सध्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिथे त्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. ही व्यक्ती ज्या १२९ लोकांच्या संपर्कात आली आहे त्यामधील ७९ जण राजधानी एक्स्प्रेसमधील त्याचे सहप्रवासी होते. ६ मार्च रोजी ही व्यक्ती इटलीहून दिल्लीत पोहोचली होती. तिथे करण्यात आलेल्या स्क्रिनिंगमध्ये करोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती.

करोनाची लक्षण आढळली नसली तरी त्याला १४ दिवस घऱात एकटं राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. कोणाच्याही संपर्कात येऊ नका अशी सूचना त्याला देण्यात आली होती. पण त्याने भुवनेश्वर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ११ मार्चला दिल्लीमधील गेस्ट हाऊस आणि त्यानंतर इतर गेस्ट हाऊसमध्ये तो वास्तव्य करत होता.

दिल्लीत बदलले तीन गेस्ट हाऊस
एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, “संबंधित व्यक्तीने एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये रात्र घालवली. यानंतर तो आयआयटी दिल्ली गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट झाला. यानंतर त्याने पहाडगंज येथील तिसऱ्या गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य केलं. ११ मार्च रोजी त्याने भुवनेश्वरला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास केला”.

त्याचे वडील त्याला घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. रिक्षातून त्याला ते घरी घेऊन गेले. १३ मार्च रोजी तपासणीसाठी तो कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पोहोचला. दुसऱ्याच दिवशी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. रविवारी त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

Story img Loader