एकीकडे देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असतानाच सोशल नेटवर्किंगवर अफवांचे पेव फुटले आहे. सध्या सोशल मिडियावर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या नावाने एक संदेश व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये भारतातील लॉकडाउनसंदर्भात प्रोटोकॉल लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये सर्वात घातक अशा करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन प्रोटोकॉल राजी केले आहेत. तसेच भारतामधील २१ दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर याचा कालावधी वाढण्यात येणार असल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. भारतामध्ये लॉकडाउनचे प्रोटोकॉल कसा असेल यासंदर्भात सांगताना १५ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान लॉकडाउन हटवण्यात येईल त्यानंतर पुन्हा २० एप्रिलपासून १८ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात येईल. या काळामध्ये रुग्णांची संख्या वाढली नाही तर लॉकडाउन काढून टाकण्यात येईल असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. पण हा मेसेज इतका व्हायरल झाला आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या ईशान्य आशियाच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. अशाप्रकारचा कोणताही आदेश डब्ल्यूएचओने दिलेला नाही असं या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. “डब्ल्यूएचओच्या नावाने सोशल मिडियावर फिरत असणारा लॉकडाउन प्रोटोकॉलचे संदेश तर्कशून्य आणि खोटे आहेत. डब्ल्यूएचओने लॉकडाउनसाठी कोणतेही प्रोटोकॉल जारी केलेले नाहीत,” असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
Messages being circulated on social media as WHO protocol for lockdown are baseless and FAKE.
WHO does NOT have any protocols for lockdowns. @MoHFW_INDIA @PIB_India @UNinIndia— WHO South-East Asia (@WHOSEARO) April 5, 2020
पीआयबीचे स्पष्टीकरण
व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुनही डब्ल्यूएचओच्या नावाने फिरणार हा संदेश खोटा असल्याचे ट्विट करण्यात आलं आहे.
Claim : A so-called circular, said to be from WHO is floating around on whatsapp, saying that it has announced a lockdown schedule.
Fact : @WHO has already tweeted it as #Fake https://t.co/GB7rQ0t9lJ pic.twitter.com/3M5RBLoA3i
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 5, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फर्न्समध्ये लॉकडाउन उठवण्यासंदर्भात चर्चा केली. टप्प्याटप्प्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल केले जातील असे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भात काही सल्ला असल्यास तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे आवाहन मोदींनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना केलं आहे.