देशामध्ये करोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या १२ तासात (५ एप्रिल संध्याकाळी ते ६ एप्रिल सकाळी) देशात ४९० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ४ हजार ६७ इतका झाला आहे. एकीकडे करोनाच्या संकटाशी देश सामना करत असतानाच दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर अफवा पसरवल्या जात आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री यांच्यासंदर्भातील एक अफवाही पसरवली जात आहे. मात्र आता यासंदर्भात थेट सकरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे.

काय आहे ही अफवा

मागील काही दिवसांपासून एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉर्ट प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एका वृत्तवाहिनीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोना झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अमित शाह दिसत असून हिंदीमध्ये, ‘गृहमंत्री अमित शाह करोना की चपेट मे’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

पीआयबीचे स्पष्टीकरण

व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन अमित शाह यांच्याबद्दलच्या बातमीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “एका हिंदी वृत्तवाहिनीच्या नावाने मॉर्फ (छेडछाड आणि बदल) केलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने तो व्हायरल केला जात आहे. कृपया हा फोटो शेअर आणि फॉर्वड करु नका,” असं आवाहन पीआयबीने केलं आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आल्यानंतरही अफवा पसरवण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीय. देशातील अनेक ठिकाणी पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळूनच ती शेअर करा असं आवाहन पोलीस त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटच्या माध्यमातून करत आहे.