करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील रणनीती ठरवण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काही इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. लॉकडाउन वाढवण्यासंबंधी उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून काही निर्बंध शिथील करत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाला वेगवेगळ्या राज्य आणि क्षेत्रांकडून माहिती घेऊन विश्लेषण करण्यास सांगितलं आहे. काही राज्यांनी तर आधीच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्नाटकसारख्या राज्यांनी धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर सर्वसहमतीने निर्णय घ्यावा लागणार आहे.
धार्मिक स्थळांवर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अशक्य आहे. त्यामुळे खूप मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापासूनच देशभरातील सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याआधी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं. अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन ३ मे आणि त्यानंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये चिंता वाटणारी ठिकाणे तसंच १ जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत यासंबंधी माहिती जाणून घेतली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अमित शाह नेहमी हजर असायचे.