करोनाचा संसर्ग झाल्याने एक महिला एवढी वैतागली की तिने एक विचित्र गोंधळ घालून ठेवला. करोना पॉझिटिव्ह महिलने आपल्या सूनेला मिठी मारुन तिलाही करोना पॉझिटिव्ह केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला पुढील काही दिवस एकटं रहावं लागेल, कोणीही आपल्याला भेटायला येणार नाही या विचाराने ही महिला एवढी चिंतेत पडली की आयसोलेशनदरम्यानचा एकटेपणा टाळण्यासाठी तिने चक्क सुनेला मिठी मारली आणि सुनेलाही बाधित केलं.
संबंधित घटना तेलंगणमधील सोमरीपेटा गावातील आहे. येथे करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेला घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. आयसोलेशनमध्ये असल्याने घरातील कोणताच सदस्य तिला भेटत नव्हता. या महिलेच्या संपर्कात आल्यास आपल्यालाही लागण होईल या भीतीने घरातील सर्वच सदस्य त्यांच्यापासून दूर राहू लागले. मात्र यामुळे ही महिला एवढी नाराज झाली की तिने जबरदस्तीने आपल्या सुनेची गळाभेट घेतली. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या सुनेलाही करोनाची लागण झाली.
या सुनेला करोनाची लागण झाल्यानंतर तिला सोमरीपेटा गावातून बाहेर काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. या महिलेच्या बहिणीने तिला मदत केली. बहिणीच्या मदतीने ही महिला राजन्ना सिरसिला जिल्ह्यातील थिम्मापुर गावातील आपल्या माहेरच्या घरामध्ये आयसोलेट झाली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासुपासून सर्वजण दूर राहू लागल्याने ती मानसिक दृष्ट्या खचलेली आणि घरातील लोक माझ्यापासून दूर जात असल्याची भीती तिला वाटत होती. म्हणूनच तिने आपल्या सुनेलाही करोना व्हावा या हेतूने तिला जबरदस्तीने मिठी मारली.
सासूमुळे करोनाची बाधा झालेल्या माहिलेने “तुला सुद्धा करोनाची लागण झाली पाहिजे असं म्हणत माझ्या सासूने मला तिच्याकडे खेचत गळाभेट घेतली,” अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. करोनाची लागण झाल्यापासून घरातील सर्व मंडळी सासूपासून दूर राहत होती. त्यांना आयसोलेट करण्यात आलेलं. जेवणसुद्धा त्यांच्या रुमच्या बाहेर ठेवलं जायचं. त्यांच्या नातवंडांनाही त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आल्याने त्या वैतागलेल्या, असं या सुनेनं म्हटलं आहे.
आयसोलेशनमधील एकटेपणामुळे कंटाळेल्या सासूला सुनेलाही करोना व्हावा असं वाटतं होतं. सासूने घरातील सर्व सदस्यांना, मी मेल्यानंतर तुम्हा सर्वांना सुखाने जगायचं आहे ना?, असं म्हणत अचानक सुनेला मिठी मारली. या सुनेची चाचणी केली असता तिला संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत. मात्र तिला तिच्या माहेरी ठेवण्यात आलं आहे.