करोना संकटाचे ढग हळूहळू कमी होत असून ते लवकरच संपेल असं सांगितलं जात असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र महत्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे नवे व्हेरियंट वाइल्ड कार्ड असल्याचा उल्लेख करताना ओमायक्रॉन हा काही शेवटचा व्हेरियंट नसून अजून काही नवे व्हेरियंट समोर येण्याची मोठी शक्यता असल्याचं सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तराचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड १९ तांत्रिक प्रमुख मारिया वॅन केरखोव्ह यांनी आरोग्य संघटना ओमायक्रॉनच्या चार वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.
“आपल्याला या व्हायरसबद्दल बरीच माहिती आहे. पण आपल्याला सर्वच माहिती नाही. खरं सांगायचं तर हे व्हेरियंट म्हणजे वाइल्ड कार्ड आहेत. उत्परिवर्तित होत असताना होणाऱ्या बदलांमुळे आम्ही व्हायरसचं रिअल टाइममध्ये ट्रॅकिंग करत आहे. या व्हायरसकडे अजूनही बाहेर पडण्यासाठी बरीच जागा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“ओमायक्रॉन हा सध्या चिंता वाढवणारा व्हेरियंट आहे. पण जागतिक आरोग्य संघटना भाष्य किंवा चिंता व्यक्त करत असलेला हा अखेरचा व्हेरियंट नसेल. पुढील व्हेरियंट कदाचित अजून थोडा वेळ घेईल. पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यातून नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता खूप जास्त आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.
“त्यामुळे आपल्याला लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून तो रोखण्यासाठी पावलंही उचलावी लागणार आहेत,” असं मारिया यांनी सांगितलं आहे.