ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्तानं जगाला धक्का बसला. स्वतः जॉन्सन यांनीच याविषयीचा खुलासा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विट करून जॉन्सन यांना दिलासा दिला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाली असल्याचं शुक्रवारी उघड झालं. आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्यानं करोनाचा मुद्दा गंभीर झाला आहे.
दरम्यान, जॉन्सन यांनी स्वतः लाईव्ह करत याची माहिती दिली. त्यांनी माहिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागलीच ट्विट करून त्यांचं मनोबल वाढवलं. ‘आदरणीय पंतप्रधान बोरिस जॉन्सनजी, तुम्ही एक योद्धा आहात आणि या संकटावर तुम्ही निश्चिपणे मात कराल. तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी आणि ब्रिटनच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
Dear PM @BorisJohnson,
You’re a fighter and you will overcome this challenge as well.
Prayers for your good health and best wishes in ensuring a healthy UK. https://t.co/u8VSRqsZeC
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2020
बोरिस जॉन्सन काय म्हणाले?
बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या स्वतःच विलगीकरण करून घेतलं आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे,’ असं जॉन्सन यांनी सांगितलं होतं.