पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी शेट्टी यांनी ‘मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांशी, मजूरांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली असती तर अजून आनंद झाला असता,’ असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे.
देशात सध्या २१ दिवसांचे लॉकडाउन असल्याने पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, हिमा दास, पीव्ही सिंधू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. या बैठकी दरम्यान करोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांनी क्रीडाविश्वाची साथ मागितली आणि त्यांच्याशी करोनाच्या प्रभावाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी ट्विटवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“मोदीजी सेलिब्रिटी खेळाडू बरोबर करोना बाबत चर्चा केलीत अभिनंदन!! पण गरीब मजूर, शिवारात सडून चाललेल्या पिकाकडे असहाय्य्यपणे पाहणाऱ्या शेतकऱ्याशी, सेफ्टी किट नसल्यामुळे रुग्णसेवा करता येत नाही म्हणून घालमेल होणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली असती तर अजून आनंद झाला असता,” असा टोला ट्विटवरुन शेट्टी यांनी मोदींना लगावला आहे.
मोदीजी सेलिब्रिटी खेळाडू बरोबर करोना बाबत चर्चा केलीत अभिनंदन!! पण गरीब मजूर, शिवारात सडून चाललेल्या पिकाकडे असहाय्य्यपणे पाहणाऱ्या शेतकऱ्याशी, सेफ्टी किट नसल्यामुळे रुग्णसेवा करता येत नाही म्हणून घालमेल होणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली असती तर अजून आनंद झाला असता @ANI @PMOIndia
— Raju Shetti (@rajushetti) April 4, 2020
२४ मार्च रोजी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या कामागारांचे प्रचंड हाल झाले. शटडाउनमुळे रेल्वे, बस असा सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाल्याचे शेकडो कामगार राष्ट्रीय महामार्गांवरुन चालतच आपल्या राज्यांकडे निघाले. त्यामुळे या स्थलांतरित कामागारांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे वाहतूक सेवेवर परिणाम झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात पडून असून तो तिथेच खराब झाल्याच्या काही घटना देशातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आल्या आहेत. याचप्रमाणे दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी मोदींनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती असा टोला लगावला आहे.