करोना लसीकरणावरुन राज्य सरकारविरुद्ध केंद्र सरकार असे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मर्यादीत लस साठ्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत आहेत. राज्यांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका केली. त्यामुळेच आता लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र तसेच दिल्ली सरकारविरुद्ध केंद्र असा वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (७ एप्रिल २०२१ रोजी) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना म्हटलं आहे.केंद्र सरकार या संकटाच्या काळात सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकार या संकटाच्या काळामध्ये राज्य सरकारला मदत करण्याची भूमिका घेत आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. “कालच मी देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला. या वेळेस ज्या काही कमतरता आहेत त्याबद्दलच्या चर्चा मी केल्या. त्यांनी एक विश्वास दिला की केंद्र सरकार, केंद्र सरकारचं आरग्य खातं या संकटामध्ये राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची मदत आणि आपले सामुहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचं आहे मार्ग काढायचा आहे,” असं पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितलं.
करोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले असून आपल्याकडे इतर पर्याय उपलब्ध नसल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनेही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर पावलं टाकण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे, असंही पवारांनी आपल्या संवादादरम्यान म्हटलं आहे. परिस्थिती पाहून सध्या राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात असल्याचं पवारांनी फेसबुक लाइव्ह दरम्यान सांगितलं. त्यामुळेच सर्वांचं सहकार्य मिळण्याची नितांत आवश्यकता असल्याची विनंती पवारांनी राज्यातील जनतेकडे केलीय. नेते, प्रसारमाध्यमे, सार्वजनिक क्षेत्रातील काम करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील सर्व घटक इतर साऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन एकत्र येतील असा विश्वास मला आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.