करोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील शोध घेण्याबद्दलचा वाद काही शांत होत नसतानाच आता एक धक्कादायक खुलासा काही ईमेलच्या माध्यमातून समोर आलाय. अमेरिकन प्रसारमाध्यमांना व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स सापडले असून त्यामधून बरीच धक्कादायक माहिती समोर आलीय. या ईमेल्समधून असं दिसून येत आहे की करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. असं असतानाच डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याने अनेक नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्या वक्तव्याबद्दल मागितली माफी
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने ८६६ पानांचा मजकूर असाणारा ईमेल संवाद समोर आणलाय. हा ईमेल २८ मार्च २०२० रोजी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेंशनचे निर्देशक जॉर्ज गाओ यांनी डॉ. फौची यांना पाठवला होता. या ईमेलमध्ये गाओ यांनी अमेरिकेतील लोकांना मास्क घालण्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अमेरिकेमध्ये मास्क न घालण्यासंदर्भात दिलेली सूट ही मोठी चूक असल्याची टीका गाओ यांनी केली होती.
नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित
डॉ. फौची यांनी दिला रिप्लाय
चिनी शास्त्रज्ञ असणाऱ्या गाओ यांनी आपल्याच वक्तव्यासंदर्भात भाष्य करताना, मी दुसऱ्यांच्या निर्णयांना मोठी चूक कसं म्हणून शकतो?, हा शब्द मी वापरला नसून प्रसारमाध्यमांनी वापरलाय. मला अपेक्षा आहे की मला काय म्हणायचं होतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण एकत्र येऊन या विषाणूचा खात्मा करण्यासाठी काम केलं पाहिजे. या ईमेलला उत्तर देताना डॉ. फौची यांनी, मला पूर्ण कल्पना आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं. आपण हे लक्ष्य एकत्र काम करुन साध्य करुयात, असं म्हटलं होतं.
बिल गेट्स यांचंही नाव
वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की हा ईमेल मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये गाओ आणि फौचीदरम्यान झालेल्या ८६६ पानांच्या संवादापैकी एक भाग आहे. अमेरिकेतील माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत संबंधित वृत्तपत्राने ही माहिती सरकारकडून मिळवली आहे. समोर आलेल्या इमेलमध्ये डॉ. फौची यांनी आपण बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या गोंधळामध्ये बिल गेट्स यांच्या नावाचाही उल्लेख केला जातोय. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या गेट्स यांच्यावर आधीपासूनच ऑक्सफर्ड करोना लसींसंदर्भात आरोप करण्यात येत आहेत.
नक्की पाहा फोटो>> घटस्फोटाचा अर्ज करणारे बिल गेट्स सेकंदाला कमावतात १२ हजार; एकूण संपत्तीचा आकडा आहे…
मी तुम्हाला टीव्हीवर रोज पाहते…
डॉ. फौची यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर या अधिकऱ्याने गेट्स यांचे सल्लागार असणाऱ्या एमिलिओ एमिनी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान या अधिकाऱ्याने एमिनी यांच्याकडे डॉ. फौची यांच्या आरोग्यासंदर्भातील चिंता व्यक्त केली. एमिनी यांनी २ एप्रिल २०२० रोजी डॉ. फौची यांना एक ईमेल केला होता. मी जवळजवळ रोज तुम्हाला टीव्हीवर पाहते. तुम्ही खूप भरभरुन बोलता. मात्र मला तुमच्या आरोग्यासंदर्बात चिंता वाटते. देशाला आणि जगाला तुमच्या नेृत्वाची गरज आहे, असं या ईमेलमध्ये एमिनीने म्हटलं आहे. या ईमेलला दुसऱ्या दिवशी डॉ. फौची यांनी उत्तर दिलं आहे. मी सध्य परिस्थितीमध्ये वर्तमानाशीसंबंधित जेवढं जोडून घेता येईल तितका प्रयत्न करत आहे, असं डॉ. फौची म्हणाले होते.
नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?
ट्रम्प यांच्यासोबत ३६ चा आकडा
डॉ. फौची यांचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. अनेकदा ट्रम्प यांनी उघडपणे डॉ. फौची यांच्यासंदर्भातील नाराजी व्यक्त केलीय. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ट्रम्प यांनी सार्वजनिक मंचावरुन डॉ. फौची यांना पदावरुन हटवण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. फौचींना हटवण्याच्या घोषणा दिल्या जायच्या. मात्र राजकीय नुकसान होऊ नये म्हणून ट्रम्प यांनी डॉ. फौचींना पदावरुन हटवलं नाही. डॉ. फौची हे मागील बऱ्याच काळापासून भारतामध्येही चर्चेत आहेत. भारतातील करोना व्यवस्थापन आणि सल्ल्यांमुळे त्यांचं नाव भारतीय प्रसारमाध्यमांमध्येही सतत झळकत असतं.