बिहारमधील मुजफ्फरपुरमधील सीजेएम न्यायालयामध्ये सोमवारी चक्क चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि चीनचे भारतामधील राजदूत सुन वेदोंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्तींविरोधात करोना विषाणू पसरवण्याचा डाव रचल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी ११ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.
न्यायालयाचे अधिवक्ता सुधीर कुमार ओझा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारतातील चीनचे राजदूर सुन वेदोंगे या दोघांनी करोना विषाणू पसरवण्याचा डाव रचल्याचे म्हटले आहेत. ही तक्रार न्यायालयाने सुनावणीसाठी वर्ग करुन घेतली आहे. आरोपींने करोना पसरवण्याचा कट रचला आणि त्यानुसार त्यांनी या विषाणूची निर्मिती केली. एक जैविक शस्त्र म्हणून या विषाणूचा वापर करण्याचा आरोपींचा इरादा होता. या शस्त्राचा वापर करुन चीनला जागतिक महासत्ता बनवण्याचा या दोघांचा विचार होता असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. या विषाणूचे नाव वुहान ४०० असे ठेवण्यात आले होते. एक कटाचा भाग म्हणून या विषाणूंचा प्रयोग करण्यात आला. मात्र यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, असंही या याचिकेमध्ये म्हटलं आहे.
जगभरामध्ये दीड लाखांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करोनामुळे भारतामधील लोकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने या खटल्याच्या सुनावणीला न्यायालयाने मंजुरी दिल्याचे समजते.
करोनामुळे भारतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण या विषाणूचा संसर्ग झाल्याने दागावला आहे. देशातील करोनाबाधित व्यक्तींची संख्या १०० हून अधिक झाली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी स्तरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.