देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक नसल्याचं दिसत आहे. देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचं संकट मात्र कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ७५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ४६ हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

२६ राज्यांत लॉकडाउन सदृश्य निर्बंध

देशात करोनाचा फैलाव वेगाने होत असून, आठवडाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. देशात रविवारी करोनाचे ४,०३,७३८ रुग्ण आढळले, तर ४,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडाभरासाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आजपासून (१० मे) लॉकडाउन लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास २६ राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध लागू आहेत.

Story img Loader