पहिल्या लाटेपेक्षा करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड असल्याचं दररोज येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. दररोज नवनवे उच्चांक नोंदवले जात असून, देशात मंगळवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात १ हजारपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात करोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० ते १३ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीपासून हे चित्र बदललं असून, अवघ्या दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. केंद्रानं जाहीर केलेली ही आकडेवारी भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ करोना बाधित आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रातील वाढ कायम

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येनं करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भरच पडत आहे. मंगळवारी (१३ एप्रिल) करोनाबाधितांच्या संख्येनं आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ५,९३,०४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

Story img Loader