देशातली गेल्या २४ तासातली करोना रुग्णांची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. हे आकडे दिलासादायक असल्याने देशातली करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे असं म्हणायला हरकत नाही. देशातल्या करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तर घटतेच आहे. मात्र नवबाधितांची संख्याही कमी कमी होताना दिसत आहे.

काल दिवसभरात देशात ३९,७९६ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ७१ वर पोहोचली आहे. तर देशातल्या आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ९७ लाख ४३० झाली असून काल दिवसभरात ४२ हजार ३५२ रुग्ण करोनामुक्त झाले.


देशातल्या मृतांची संख्या आज ८०० च्या खाली आल्याचं चित्र आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांत ७२३ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४ लाख २ हजार ७२८ वर पोहोचली आहे.

देशातल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाने आता चांगलाच वेग घेतला आहे. देशात आत्तापर्यंत एकूण ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ४६ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. काल दिवसभरात एकूण १४ लाख ८१ हजार ५८३ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०लाख ३५ हजार ८०४ असून दुसरा डोस घेणारे ४ लाख ४५ हजार ७७९ नागरिक आहेत.

Story img Loader