डबल म्युटेशनसह करोनाच्या विविध स्ट्रेनमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशात करोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून, रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,४६,७८६ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक असून, परिस्थिती बिकट झाल्याचंच चित्र आहे. रुग्णावाढीबरोबरच देशात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. देशात २४ तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून देशात होत असलेली रुग्णवाढ शनिवारी नव्या पातळीवर पोहोचली. एका दिवसांत आढळून आलेल्या जागतिक रुग्णवाढीचा विक्रम मोडीत निघाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, ही माहिती सगळ्यांनाच काळजीत टाकणारी आहे.

आणखी वाचा- करोनामुळे देशात दररोज ५,००० मृत्यू होणार?; वॉशिंग्टन विद्यापीठाचा इशारा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात २ हजार ६२४ जणांचे प्राण करोनानं हिरावून घेतले आहेत. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात २४ तासांच्या काळातच २ लाख १९ हजार ८३८ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत आहेत.

आणखी वाचा- ‘तुमच्याकडील करोना परिस्थिती गंभीर, आम्ही रुग्णवाहिका पाठवतो तुम्ही फक्त…’; पाकिस्तानमधून मोदींना पत्र

मास्क न वापरण ठरतंय घातक

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने केलेल्या अभ्यासात मास्कच्या वापराबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर २०२० च्या मध्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधी पर्यंत करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घसरण होत होती. एप्रिलमध्ये अचानक यात वाढ झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुप्पटीने करोना रुग्णवाढ झाल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या ७१ टक्क्यांने वाढली आणि दररोज होणारे मृत्यू ५५ टक्क्याने वाढले. करोना नियमावलीचं पालन न केल्यानं, सोहळ्यांना झालेली गर्दी आणि मास्क वापरण्यास नागरिकांकडून नकार दिल्यानेच ही वाढ झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.

Story img Loader