करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा देशाला बसला असून, संसर्ग प्रसाराच्या वेगाने आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. चार लाखांच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवण्यात आली असून, गेल्या २४ तासांत यात घट झाल्याचं दिसून आलं. मात्र काळजीची बाब म्हणजे दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येचा वेग कायम असल्याचं आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे.
देशातील दररोजच्या करोना परिस्थितीचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशभरात ३ लाख ७३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दिवसभरात तब्बल ३ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण करोना मृतांची संख्या २ लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
India reports 3,68,147 new #COVID19 cases, 3,00,732 discharges, and 3,417 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,99,25,604
Total recoveries: 16,29,3003
Death toll: 2,18,959
Active cases: 34,13,642Total vaccination: 15,71,98,207 pic.twitter.com/C0UrYU3q44
— ANI (@ANI) May 3, 2021
देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ४९ टक्के रुग्णसंख्या फक्त पाच राज्यांतील आहे. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील विविध राज्यांनी लॉकडाउन वा कडक निर्बंध लागू केले आहेत. हरयाणा सरकारनेही आता लॉकडाउनचा निर्णय घेतला असून, वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाउनचा विचार करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे.