देशात दुसऱ्या लाटेचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर दिवसेंदिवस हे संकट गडद होताना दिसत आहे. देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडलेली असताना भारतासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात जूनमध्ये दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं रौद्ररुप धारण केलं आहे. दररोज बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, आरोग्य यंत्रणांवर असह्य ताण पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे बेडपासून ते इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. देशातील अशी परिस्थिती असताना आता आणखी एक भयावह अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील, असं इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. ‘लॅन्सेट’मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
‘भारतातील दुसऱ्या करोना लाटेच व्यवस्थापन : तातडीचे उपाय’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात करोना महामारीच्या प्रमुख मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, करोना संक्रमणाचा वेग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या अंगानी बघितलं तर करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
पहिलं म्हणजे दुसऱ्या लाटेत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा जास्त आहे. फेब्रवारी ते एप्रिल या कालाधीत १० हजार रुग्णसंख्येवरून ८० हजार रुग्णसंख्या होण्यास फक्त ४० दिवसच लागले. पहिल्या लाटेत म्हणजेच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा हा टप्पा गाठण्यासाठी तब्बल ८३ दिवस लागले होते. दुसरं म्हणजे लक्षणं नसलेल्या वा लक्षणांची तीव्रता कमी असलेल्या रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आणि मृत्यूचं प्रमाणही कमी होतं. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला म्हणजे मार्च २०२० मध्ये मृत्यूदर १.३ टक्क्यांच्या जवळपास होता. तर २०२१मध्ये ०.८७ इतका आहे, असंही यात म्हटलं आहे.