केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत लस देण्याचं धोरण २१ जून २०२१ पासून लागू केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं. खास करुन भाजपाशासित राज्यांमध्ये लसीकरणाचा उत्सव म्हणत मोठ्याप्रमाणात लसीकरण करुन घेण्यासंदर्भात राज्य सरकारांनीच पुढाकार घेतल्याचं चित्र दिसलं. करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भीती व्यक्त केली जात असतानाच सरकारकडून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु असून त्याचा हा भाग असल्याचं सांगण्यात आलं. मध्य प्रदेशने या लसीकरणामध्ये १७ लाख लसी एकाच दिवशी देण्यात आल्याचा दावा केला. मात्र आता या लसीकरणामधील नवीन गोंधळ समोर येत असून लस न घेतलेल्या व्यक्तींना एसएमएसवरुन लस घेतल्याची माहिती देणे, एकाच व्यक्तीला तीन अनोळखी लोकांच्या नावाच्या लसीकरण प्रमाणपत्रांची लिंक पाठवणे, सरकारी कामांसाठी दिलेल्या कागदपत्रांवरुन लस न घेताच लस दिल्याचं प्रमाणपत्र मिळणं असा गोंधळ समोर आलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> विक्रमी कामगिरीच्या नावाखाली मध्य प्रदेशात गोंधळ… १३ वर्षाच्या मुलाला लस दिल्याचा SMS; वय दाखवलं ५६

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १७ लाखांहून अधिक जणांना एकाच दिवशी लस देण्यात आल्याचा दावा २१ जूनच्या लसीकरणासंदर्भात बोलताना केला. मात्र एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार राज्यभरामध्ये अनेक अशी प्रकरणं समोर आली आहेत जिथे लोकांना लस न घेताच त्यांना प्रमाणपत्र आणि लसीकरण यशस्वी झाल्याचे मेसेज आले आहेत. या सर्व गोंधळामुळे सरकारने विक्रमी लसीकरणाचा केलेला दावा हा संभ्रमात टाकणारा, फसवणूक करणारा असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत.

पेन्शन नाही पण लसीकरणाचा मेसेज आला…

भोपाळमध्ये राहणाऱ्या नुजहत सलीम यांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज आला. मात्र त्यांनी लस घेतलीच नव्हती. नुजहत यांना २१ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या आसपास एक मेसेज आला. यामध्ये तुमचं लसीकरण पूर्ण झालं आहे असं सांगण्यात आलेल. या लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून पेन्शनशीसंबंधित कागदपत्रांवरील माहिती देण्यात आलेली. धक्कादायक बाब म्हणजे नुजहत यांना पेन्शनच्या कागदपत्रांच्या आधारे पेन्शन दिलं जात नाही तरी त्याचा वापर करुन लसीकरण झाल्याचं दाखवण्यात आलंय.

नक्की वाचा >> ठाणे : एकाच वेळी २८ वर्षीय महिलेला दिले करोना लसीचे तीन डोस?; भाजपाने केली चौकशीची मागणी

एकाच क्रमांकावर तीन अनोळखी लोकांच्या नावे मेसेज

अशापद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे लसीकरणाची नोंद झाल्याचं हे काही एकमेव प्रकरण नाहीय. २१ जून रोजीच सतना येथे राहणाऱ्या चैनेंद्र पांड्ये यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. पांड्ये यांना पाच मिनिटांमध्ये तीन मेसेज आले. या तिन्ही मेसेजमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती देत लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या लिंक पाठवण्यात आलेल्या. आपण या तीनपैकी एकाही व्यक्तीला ओळखत नसून हे मेसेज मला कसे आले याचं कोडं उलगडलं नाहीय असं पांड्ये म्हणाले.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

मंत्री म्हणतात, “तुम्हाला अशी माहिती कुठून मिळते”

यासंदर्भात एनडीटीव्हीने मध्य प्रदेश राज्याचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी असं काही घडलच नसल्याचा दावा केला. अशी कोणतीही समस्या नसून उलट पत्रकारांनाच तुम्हाला अशी माहिती कुठून मिळते असा प्रश्न सारंगा यांनी विचारला. असं काही आढल्यास त्याची चौकशी केली जाईल असंही सारंग म्हणाले.

काँग्रेसचा हल्लाबोल

मध्य प्रदेश काँग्रेसने करोना लसीकरणासंदर्भातील या गोंधळावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी अशाप्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सरकारने विक्रमाच्या नादात आकडेवारीमध्ये मोठा गोंधळ घातल्याचा आरोप सलूजा यांनी केलाय. मध्य प्रदेशमधील १३ वर्षाच्या मुलाला आणि मरण पावलेल्यांचंही लसीकरण करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. बैतूलमधील ४७ गावांमध्ये एकाही व्यक्तीचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. रेकॉर्ड हा केवळ दावा आहे असंही सलूजा म्हणाले.

१३ वर्षाच्या मुलालाही लस दिल्याचा मेसेज

२१ जून रोजी म्हणजेच मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या लसीकरण उत्सवाच्या दिवशी भोपाळमध्ये राहणाऱ्या १३ वर्षीय वेदांत नावाच्या मुलाचं लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. करोना लसीकरणाचा प्रमाणपत्रावर या मुलाचं वय ५६ दाखवण्यात आलं आहे. वेदांतचे वडील रंजीत डांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला. या एसएमएसमध्ये वेदांतला लस देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं. वेदांत केवळ १३ वर्षांचा असून देशात लहान मुलांचं लसीकरण अद्याप सुरु झालेलं नाही. यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न रंजीत यांनी केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या लिंकवर लसीकरणाचं प्रमाणपत्र रंजीत यांनी डाऊनलोड केलं असता वेदांतच्या नावाने लसीकरण करण्यात आल्याचं प्रमाणपत्र बनवताना काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये अन्य एका कामासंदर्भात जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन माहिती घेण्यात आल्याचं उघड झालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus vaccination madhya pradesh record jabs day people who have not got vaccines receiving messages scsg