भारतामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यात आप्तकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीसंदर्भात एक नवा खुलासा समोर आला आहे. ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरीरामध्ये अधिक प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण होतात. करोना व्हॅक्सिन इंडक्टेड अ‍ॅण्टीबॉडीज टीट्री (म्हणजेच कोव्हॅट) अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासाहून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासामध्ये दोन्हींपैकी कोणत्याही लसीचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सेरोपोझिटिव्हिटी अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होतं, असं या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा अहवाल प्रकाशित झालेला नसून त्यावरील काम सुरु असल्याने सध्या त्याचा वापार क्लिनिकल प्रॅक्टीससाठी करता येणार नाहीय. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे दोन डोस घेतल्यानंतर मोठ्या संख्येने अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण होत आहेत. मात्र सेरोपोझिटिव्हिटी आणि अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये अधिक असल्याचं दिसून आलं आहे. सेरोपोझिटिव्हिटी म्हणजेच अ‍ॅण्टीबॉडीज शरीरामध्ये असतानाच विषाणूला प्रतिसाद देण्याची क्षमता.

नक्की वाचा >> समजून घ्या : Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?

“या अभ्यासामध्ये ५५२ आरोग्य कर्मचारी सहाभगी झाले होते. यापैकी ३२५ पुरुष तर २२७ महिला होत्या. ४५६ जणांना कोव्हिशिल्डचा तर ९६ जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. पहिल्या डोसनंतर ७९.३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरामध्ये सेरोपोझिटिव्हिटी रेट दिसून आला. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीजचे प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होतं. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाणे ८६.८ तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये ४३.८ टक्के इतकं होतं,” असं अहवालात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

करोनाच्या कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभ्यासामध्ये सहभाग घेतला होता. करोनाचा संसर्ग न झालेल्या मात्र दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीच या संशोधनासाठी निवड करण्यात आलेली.  “सध्या भारतभरामध्ये सर्वच स्तरामध्ये सुरु असणाऱ्या करोना व्हॅक्सिन इंडक्टेड अ‍ॅण्टीबॉडीज टीट्री (म्हणजेच कोव्हॅट) अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसंदर्भात अभ्यास करण्यात आला. यामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या आणि न झालेल्यांवर वेगवेगळं संशोधन करण्यात आलं. सार्क कोव्ही-२ अ‍ॅण्टी-स्पाइक बाईण्डींग अ‍ॅण्टीबॉडीज कर्मचाऱ्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी लस देण्यात आल्यानंतर २१ दिवस तसेच दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण होण्याआधी चार वेळा नमूने घेण्यात आले,” असं अभ्यासात नमूद केलं आहे. मात्र दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन्ही लसी परिणामकारक पद्धतीने विषाणूंना तोंड देऊ शकणारी प्रतिपिंडे शरीरामध्ये तयार करत असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल

“दोन्ही लसींमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हिशिल्डनंतर सेरोपोझिटिव्हिटी आणि अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हॅक्सिनपेक्षा अधिक आहे. सध्या सुरु असणाऱ्या संशोधनानंतर दोन्ही डोसचा रोगप्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो हे स्पष्ट होणार आहे,” असं अहवालात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus vaccine covishield produced more antibodies than covaxin preliminary study scsg