करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केलं. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नानं डोकं वर काढलं होतं. त्यावर केंद्र सरकारनं गुरुवारी १ लाख ७० हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वागत केलं आहे.
भारतात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झालं आहे. असंघटित आणि दररोज काम करून उदरर्निवाह चालवणाऱ्यांचा प्रश्न उपस्थित होतं होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी केली.
CoronaVirus : राहुल गांधींचा इशारा खरा ठरला; मोदी सरकारला आधीच केलं होतं सावध
अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचं कौतुक केलं. ‘सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेनं टाकण्यात आलेलं पहिलं पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचं भारतावर ऋण आहे,’ असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
The Govt announcement today of a financial assistance package, is the first step in the right direction. India owes a debt to its farmers, daily wage earners, labourers, women & the elderly who are bearing the brunt of the ongoing lockdown.#Corona
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 26, 2020
‘देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत,’ असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेजची घोषणा केली.