देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदीन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करत त्यांना समूळ नष्ट करावे लागेल असे मत व्यक्त केले. तसेच भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. मागील सरकारच्या काळात जे लोक बँकांना लुटून देश सोडून गेले आहेत, त्यांची सपत्ती जप्त करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीदेखील नरेंद्र मोदी यांनी दिली.
“भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. आधारकार्ड, मोबाईल या आधुनिक साधनांचा वापर करून चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवण्यात आम्हाला यश आले. मागील सरकारमध्ये जे लोक बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोकांना तुरुंगात डांबलं आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत आहोत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा >> Independence Day 2022 Live : आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पाहावे लागेल- नरेंद्र मोदी
“आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“घराणेशाही हादेखील एक मुद्दा आहे. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरुकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल,” असे म्हणत मोदी यांनी घराणेशाहीला विरोध दर्शवला.
हेही वाचा >> पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई
“राजकारणातही परिवारवाद संपवायला हवा. घराणेशाहीच्या राजकारणाला देशाशी काही देणघेणं नसतं. याच कारणामुळे देशातील राजकारण शुद्धीसाठी घराणेशाहीच्या मानसिकतेला दूर करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. घराणेशाहीविरोधातील लढाईसाठी मला तुमची साथ हवी आहे,” असे मोदी देशातील जनतेला उद्देशून म्हणाले.