उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या राजवटीत राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असून या सरकारने त्याबाबत माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या सरकारलाही मागे टाकले आहे, अशी जळजळीत टीका करून सपाच्याच एका आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे.
बलिया जिल्ह्य़ातील सिकंदरपूरचे आमदार मोहम्मद रिझवी यांनी एकाच आठवडय़ात राज्य सरकारवर दुसऱ्यांदा हल्ला चढविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ज्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे ते अधिकारी आमदारांच्या तक्रारी ऐकूनच घेत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात, असेही रिझवी यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव या प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडेही सदर अधिकारी दुर्लक्ष करतात. सपाच्या राजवटीत भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असून त्याबाबत मायावती सरकारलाही मागे टाकले आहे, असेही रिझवी यांनी वार्ताहरांना सांगितले.
राज्य सरकारचा कारभार चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या इच्छाशक्तीचा आणि कठोरपणाचा अखिलेश यांच्याकडे अभाव आहे आणि त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या स्वप्नाचा भंग होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा