I-T raid Dhiraj Sahu : काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथील कार्यालय आणि निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने ६ डिसेंबर रोजी धाड टाकली. मागच्या पाच दिवसांत त्यांच्याकडून ३०० कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी यावर टीका करून काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यानंतर देशभरातील भाजपा नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आता राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही एक्स या सोशल मीडिया साईटवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “बंधू उत्तर तर द्यावेच लागेल, तुम्हाला ही (धीरज साहू) आणि तुमचे नेते राहुल गांधींनाही”, अशी पोस्ट करून हे पैसे कुणाचे? याचे उत्तर जेपी नड्डा यांनी मागितले आहे.
जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून पळून थकून जाल, पण कायदा तुमचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर पंतप्रधान मोदी हे ‘भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी’ आहेत. जनतेकडून लुटलेला पै-पै परत द्यावा लागेल.”
हे वाचा >> काँग्रेस खासदाराच्या घरातून ३०० कोटींची रोकड जप्त; पैसे मोजण्यासाठी १०० अधिकारी, ४० मशीन तैनात
भाजपाचे अनेक नेते काँग्रेसवर तुटून पडले आहेत. भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी धीरज साहू यांचा भारत जोडो यात्रेमधील राहुल गांधी यांच्यासह चालत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, धीरज साहू दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. पण तरीही काँग्रेसने त्यांना तीन वेळा राज्यसभेवर घेतले.
धीरज साहू यांचे कुटुंबिय स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंधित आहेत, असा दावा साहू यांच्याकडून केला गेला. हा धागा पकडून मालवीय म्हणाले की, काँग्रेसने साहू यांच्यापासून अंतर ठेवण्यापेक्षा साहू कोणत्या ‘गांधी’चे एटीएम आहेत, हे जाहीर करावे.
दरम्यान काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत साहू यांनीच सर्व काही स्पष्ट केलं पाहिजे.
पाचव्या दिवशी ३०० कोटी हस्तगत
प्राप्तीकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. १० डिसेंबर) मोजणी पूर्ण होऊन या कारवाईत जप्त केलेल्या एकूण रोख रकमेचा तपशील दिला जाईल. मात्र ही रक्कम ३०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.