आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सर्वच पालकांचं आद्य कर्तव्य असतं. यासाठी आपण सगळेच डोळ्यांत तेल घालून मुलांची काळजी घेत असतो. पण मुलांचे आजार बरे व्हावेत, म्हणून त्यांना देण्यात येत असलेली औषधंच त्यांच्यासाठी हानीकारक ठरू लागली, तर पालकांमध्ये चिंता पसरणं साहजिक आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं नुकत्याच दिलेल्या एका इशाऱ्यामुळे भारतात उत्पादित आणि वितरीत होणाऱ्या चार कफ सिरपवर संशयाचं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. WHO नं व्यक्त केलेल्या संशयानंतर भारत सरकारने या कफ सिरपची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं घडलं काय?
आफ्रिकेतील गॅम्बिया (The Gambia) या देशामध्ये नुकतीच तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे मृत्यू या मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे झाल्याचा संशय WHO ला आहे. एनडीटीव्हीनं आरोग्य मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार WHO नं यासंदर्भात डीसीजीएला (Drugs Controller General of India) २९ सप्टेंबर रोजी सतर्कतेचा इशारा दिला आहे. डीसीजीएनं तातडीने या सगळ्या प्रकारावर हरियाणा प्रशासनाशी चर्चा करून चौकशी सुरू केली आहे.
आफ्रिकेत निर्यात होतात कफ सिरप!
भारतातील हरियाणामध्ये उत्पादित होणारी ही कफ सिरप विदेशात, विशेषत: आफ्रिकी देशांमध्ये निर्यात होतात. याच कफ सिरपचा संबंध WHO कडून गॅम्बियामध्ये झालेल्या ६६ मुलांच्या मृत्यूच्या घटनेशी लावण्यात येत आहे. हे कफ सिरप आफ्रिकेच्या बाहेरही निर्यात झाले असण्याची शक्यता WHOकडून वर्तवण्यात येत आहे.
“गॅम्बियामध्ये मृत पावलेल्या ६६ मुलांचा झालेला मृत्यू आणि किडनीला होणारे आजार यांचा या कफ सिरपशी संबंध असण्याची दाट शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया WHOचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी दिली आहे.
कोणते आहेत हे कोल्ड आणि कफ सिरप?
WHO नं दिलेल्या माहितीनुसार, सर्दी आणि खोकल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या औषधांमध्ये प्रोमेथॅझाईन ओरल सोल्युशन (Promethazine Oral Solution), कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup), मेकऑफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup) आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup) या चार औषधांचा समावेश आहे. या औषधांच्या उत्पादक कंपन्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.