पीटीआय, नवी दिल्ली

वैद्याकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अद्याप वर्ष २०२४साठी ‘नीट-यूजी’ आणि ‘पीजी’ अभ्यासक्रमांसाठी समुपदेशनाच्या वेळापत्रकाची अधिसूचना काढलेली नाही, मात्र ती लवकरच काढली जाईल असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केला. त्यापूर्वी दिवसभरात ‘नीट-यूजी’च्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन लांबणीवर पडल्याची चर्चा रंगली होती. अखेर आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी माहिती देऊन चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २०२४साठी ‘एनएमसी’ने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘सीट मॅट्रिक्स’ अंतिम केल्याचे जूनच्या अखेरच्या आठवड्यात कळवले होते. त्यावरून जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पदवी अभ्यासक्रमांसाठी आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी ‘सीट मॅट्रिक्स’ अंतिम केले जाईल. त्यानुसार, समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>इराणमध्ये सुधारणावादी अध्यक्ष; पेझे

वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी उमेदवारांचे समुपदेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, शनिवारपर्यंत त्याबद्दल कोणतीही अधिसूचना न निघाल्यामुळे ते एकतर लांबणीवर पडले किंवा रद्द झाले असे चित्र निर्माण झाले होते. दुसरीकडे, या महिन्याच्या अखेरपासून समुपदेशन सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी पीटीआयला दिली. या दरम्यान, ‘नीट-यूजी’ परीक्षा पुन्हा एकदा पारदर्शकपणे घ्यावी आणि सर्व पेपरफुटीच्या घोटाळ्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी काँग्रेसने केली.केंद्र सरकार शिक्षण व्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’वर केला.

वेळापत्रक कसे ठरते?

●आरोग्य सेवा महासंचालनालयाअंतर्गत असलेल्या ‘एमसीसी’द्वारे त्यांच्या संकेतस्थळावर ‘नीट-यूजी’ आणि ‘पीजी’साठी समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाते.

●प्रवेश परीक्षा प्रक्रियेची पूर्तता आणि राष्ट्रीय वैद्याकीय आयोगाने (एनएमसी) अंतिम केलेल्या उपलब्ध जागा, प्रवेश पात्रता गुण आणि प्रत्येक महाविद्यालयातील अभ्यासक्रम (तिन्ही एकत्रितपणे सीट मॅट्रिक्स) हे स्पष्ट झाल्यावर हे वेळापत्रक जाहीर केले जाते.