भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने जीएसएलव्ही- एफ १० या उपग्रहाच्या प्रॉम्पलेंटसंदर्भातील काम पूर्ण केलं आहे. उद्या या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं जाणार असल्याने त्याला लॉन्च पॉडवर सज्ज ठेवण्यात आलं आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अर्थ ऑर्बेटिंग सॅटेलाइटसोबत जीएसएलव्ही- एफ १० चं प्रक्षेपण होणार आहे. २२६८ किलो वजनाचा हा उपग्रह पहाटे पाच वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या मोहिमेची तयारी सध्या आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा इथे युद्धपातळीवर सुरू असून जीएसएलव्ही- एफ १० या प्रक्षेपकाला प्रक्षेपणासाठी सज्ज करण्यात आलं आहे. इस्त्रोच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय. “जीएसएलव्ही- एफ १०, ईओएस-०३ मोहीमेसाठी आज पहाटे तीन वाजून ४३ मिनिटांपासून श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काऊंटडाऊन सुरु झाले आहे,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. उपग्रहाचे लॉन्चिंग पहाटे पावणे सहाच्या सुमारास अपेक्षित असले तरी हवामानाचा अंदाज घेऊन अंतिम प्रक्षेपणाचा वेळ निश्चित केला जाणार आहे.

याआधी इस्त्रोने २८ फेब्रुवारीला एक उपग्रह प्रक्षेपण मोहिम फत्ते केली होती. त्यानंतर ५ मार्चचे याच EOS-03 उपग्रहाचे नियोजित प्रक्षेपण हे तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलले गेले होते. मात्र त्यानंतर कोरोनोच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि पुन्हा जाहिर झालेल्या लॉकडाऊनमुळे इस्त्रोने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या स्थगित केल्या होत्या. यामुळे अनेक नियोजित उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या लांबणीवर पडल्या आहेत. आता उपग्रह प्रक्षेपण मोहिमांचे वेळापत्रक पुन्हा किती लवकर सुरळीत होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे उपग्रह मोहिमा सुरू होत असतांना बहुचर्चित ‘गगनयान’ मोहिम, ज्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवला जाणार आहे, या मोहिमेच्या तयारीला विलंब झाला आहे की नाही यावर अद्याप इस्त्रोने कोणतेही भाष्य केलेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countdown for the launch of gslvf10 eos03 mission commenced tweets isro scsg