पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. यासाठी मतमोजणी सुरु असून सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास काही कल हाती आले. त्यात इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष (पीटीआय) ११४ जागांवर आघाडीवर आहे, तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष ६३ जागांवर आघाडीवर आहे.

मध्यरात्री, मतमोजणी प्रक्रियेत काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचे पाकिस्तानच्या स्थानिक प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले होते.

तत्पूर्वी, प्रारंभीचे जे कल हाती आलेत त्यानुसार इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष (पीटीआय) ७५ जागांवर आघाडीवर होते. त्यापाठोपाठ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष ५१ जागांवर तर पीपीपी पक्ष २८ जागांवर आघाडीवर होता.

मतदानपूर्व सर्वेक्षण चाचणीत तहरीक-ए-इन्साफला निसटते बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार इम्रान यांचा पक्ष आघाडीवर आहे. शेवटपर्यंत ही आघाडी अशीच टिकून राहिली तर प्रथमच इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची संधी मिळेल.

क्रिकेटचे मैदान गाजवणारा पाकिस्तानचा हा माजी कर्णधार मागच्या बऱ्याच वर्षापासून पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. त्यासाठी इम्रान यांनी बराच राजकीय संघर्षही केला आहे. इम्रान खान तब्बल पाच जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. इम्रान खान यांच्यासाठी तेथील सर्वशक्तीशाली लष्कराचाही निवडणुकांत हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे.

पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण नॅशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ३४५९ उमेदवार रिंगणात असून, चार प्रांतिक असेंब्लीच्या ५७७ जागांसाठी ८३९६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १०५.९५ दशलक्ष मतदार नोंदणीकृत आहेत. २५ जुलैला होणाऱ्या या निवडणुकीत माध्यमांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यात आला असून, लष्कराने माजी क्रिकेट कर्णधार इमरान खान याला पाठिंबा दिला आहे. लष्कराने पाकिस्तानात १९४७ पासून अनेकदा बंड करून सत्ता हातात घेतली आहे. नागरी सरकारांच्या काळातही लष्कराच्याच हातात अप्रत्यक्षपणे सत्ता होती. परदेशी व सुरक्षा धोरणे लष्करच ठरवत होते.