एलटीटीईविरोधात लष्करी कारवाई झाली त्या वेळी घडलेल्या कथित युद्ध गुन्ह्य़ांप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावतानाच या प्रश्नावरून इतर देशांनी आमच्यावर अधिकार गाजवू नयेत, असा इशारा श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी रविवारी येथे दिला.
श्रीलंकेतील मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यासंदर्भात मुक्त आणि स्वतंत्र चौकशी करण्यासंबंधी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी निर्वाणीचा इशारा देत तामिळींचा मान-सन्मान आणि त्यांच्या प्रती आदर बाळगावा, असे आवाहन केले होते. हे सर्व मार्च महिन्यापर्यंत करा, असेही कॅमेरून म्हणाले होते. सर्व प्रकारची पुनर्रचना होण्यास अधिक वेळेची आवश्यकता असून त्यासाठी विशिष्ट कालमर्यादा घातली जाऊ शकत नाही, असे राजपक्षे यांनी स्पष्ट केले. आमची विशिष्ट कायदेशीर यंत्रणा असून तिला घटनेचेही अधिष्ठान आहे. आम्हाला लोकांची मनोरचना बदलायची आहे. गेली तीन दशके संघर्ष सुरू होता. त्यामध्ये केवळ तामिळीच नव्हे तर सिंहली आणि मुस्लीम लोकही होरपळले. त्यामुळे आता त्यांची काळजी घेणे माझे कामच आहे, असे ते म्हणाले.  अशा परिस्थितीत तुम्ही एका आठवडय़ात किंवा तीन ते चार महिन्यांत बदल घडवून आणा, असे म्हणू शकत नाही, असेही राजपक्षे यांनी सांगितले.
यासंदर्भात तोडगा शोधण्याचेही आम्ही सर्वाना आवाहन केले असून एखाददुसरी व्यक्ती हे करू शकत नाही, असे सांगून श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौकशीची मागणी राजपक्षे यांनी फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा