नरेंद्र मोदी देशाची एकात्मता टिकवू शकणार नसल्यामुळे जनता त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कधीच स्वीकार करणार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना दिग्विजय सिंह यांनी ही टीका केली. ते म्हणाले, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळे ज्या व्यक्तीने आघाडीमध्ये बिघाडी केली आणि स्वतःच्या पक्षातच वादाचे पर्व सुरू केले, तो देशाला एकसंघ ठेऊच शकणार नाही. त्यामुळेच जनता त्यांना कधीही स्वीकारणार नाही.
कॉंग्रेस पक्षासाठी मोदी हा मुद्दाच नाही. आमचा पक्ष कोणत्याही एका व्यक्तीविरुद्ध लढणारा नसून, धर्मवादी विचारांच्या विरोधात असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले. भारतीय जनता पक्ष नेहमी धर्माच्या आधारावर देशामध्ये धुव्रीकरण करीत आला आहे. मुझफ्फरनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलींमागे भाजपचाच हात होता, असाही आरोप त्यांनी केला.