पीटीआय, नवी दिल्ली : पुलवामा येथे २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) हुतात्मा झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी श्रद्धांजली वाहिली.

‘सीआरपीएफ’च्या ताफ्यात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी वाहन घुसवून, दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवला होता. त्यात ४० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांना ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे लक्ष्य केले. मोदी यांनी ‘ट्वीट’ केले, की आम्ही पुलवामामध्ये या दिवशी गमावलेल्या आमच्या शूर वीरांचे स्मरण करत आहोत. आम्ही त्यांचे सर्वोच्च बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांचे धारिष्टय़ आम्हाला एक मजबूत आणि विकसित भारतनिर्मितीसाठी प्रेरित करत राहील.

 गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ट्वीट’ केले, की पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ज्या शूर सैनिकांनी आपले प्राणांचे मोल दिले, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांचे शौर्य आणि अदम्य साहस नेहमीच प्रेरणादायी राहील. राजनाथ सिंह यांनी हिंदीत केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की देश त्यांच्या धैर्य व सर्वोच्च बलिदानाला सलाम करतो. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या हुतात्म्यांच्या धैर्य आणि बलिदानाला हा देश सलाम करतो. संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभा आहे.

  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी श्रद्धांजली वाहताना नमूद केले, की पुलवामा येथे बलिदान देणाऱ्या आमच्या धैर्यवान जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. सदैव जागरूक राहून, सीमेपलीकडून जोपासल्या जाणाऱ्या दहशतवादाचा समर्थ मुकाबला करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Story img Loader