विनायक परब
प्रथमच देशव्यापी सागरी दहशतवादविरोधी मोहीम
मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००९ साली सागरी सुरक्षेसाठी वेगळी यंत्रणा अस्तित्वात आली. आजवर सागरी सुरक्षेच्या २३० मोहिमाही देशभरात पार पडल्या. मात्र एकाच वेळेस देशात अनेक ठिकाणी सागरी हल्ला झाला तर याची चाचपणी कधीच प्रत्यक्षात झालेली नव्हती. याच प्रत्यक्ष चाचपणीसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून देशव्यापी सागरी सुरक्षेसाठी सी व्हिजिल- २०१९ या दहशतवादविरोधी ऑपरेशनला देशभरात सुरुवात झाली असून हे ऑपरेशन पुढील ३६ तास सुरू राहणार आहे.
अरबी समुद्रातून (टी २०२) दुपारी ११.४५ च्या आसपास भारतीय नौदलाच्या मुंबईतील जॉइंट ऑपरेशन्स सेंटेरमध्ये हालचालींना अचानक वेग येतो. कारण गुरगावच्या नॅशनल कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन आणि इंटेलिजन्स नेटवर्कला दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या संदर्भातील माहिती मिळालेली असते. ..नंतरच्या काही सेकंदांतच जॉइंट ऑपरेशन्स सेंटरमधील सागरी सुरक्षेशी संबंधित सर्वच विविध यंत्रणांचे अधिकारी तात्काळ कामाला लागतात. संपूर्ण देशभरात हाय-अलर्ट जारी होतो. समांतरपणे त्याच वेळेस मुंबई नौदल गोदीतील फास्ट इंटरसेप्ट क्राफ्टवर (एफआयसी) असलेल्या नौसैनिकांना संदेश जातो आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच सागर लहरींवर वेगात आरूढ झालेली एफआयसी दहशतवाद्यांचा माग काढत घटनास्थळी पोहोचतेही! हा सारा दहशतवादविरोधी थरार मंगळवार सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाला आहे!
संशयित बोटींना वेगात आलेल्या दोन्ही फास्ट इंटरसेप्टर क्राफ्टने पुढे जाण्यापासून अटकाव केल्यानंतर नंतरच्या १० सेकंदांतच त्यातील एका नौकेवरील नौसैनिक कमांडोने बोटीवरील सर्व संशयितांना एका बाजूला केले, त्या वेळेस एफआयसीवरील दुसरा कमांडो संशयितांवर रायफल रोखून होता, तर तिसऱ्याने त्या बोटीच्या मालकाला वेगळे काढून त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू केली.. ती संपवतानाच त्याने संपूर्ण बोटीमध्ये काही दडविण्यात आले आहे काय याचाही शोध घेण्यास सुरुवात केली. पहिल्या कमांडोची चौकशी सुरू असताना काही आगळीक घडली तर म्हणून दुसरी एफआयसी या बोटीच्या बाजूला काही अंतरावर नौदलासोबत बांधण्यात आली आणि नवीन सागरी सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आली. त्यासाठी देशाच्या किनारपट्टीवर सागरी धोका सूचित करणारी रडार यंत्रणेची साखळीही उभारण्यात आली. देशाला लाभलेल्या तब्बल साडेसात हजार किलोमीटर्सच्या या सागरी किनारपट्टीवर २००९ नंतर आजतागायत सुमारे २३० दहशतवादविरोधी ऑपरेशन्स पार पडली, मात्र ती वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या वेळी पार पडली होती. मात्र दहशतवादी हल्ला एकाच वेळेस अनेक ठिकाणी झाला आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचे याचा शोध घेण्यासाठी आणि यंत्रणाची सज्जता तपासण्यासाठी अखेरीस देशभरात एकाचवेळेस ‘सी व्हिजिल -२०१९’ हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. देशव्यापी सागरी दहशतवादशोध मोहिमेस मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आज सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यात आली, अशी माहिती कमांड सागरी सुरक्षा अधिकारी कॅप्टन अजय यादव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
दुसरा दिवस महत्त्वाचा
या मोहिमेचा दुसरा दिवस अधिक महत्त्वाचा ठरणार असून यामध्ये रेड फोर्स भारताच्या सागरी सीमेमध्ये एकाच वेळेस विविध सागरी मार्गाचा व पर्यायांचा वापर करून घुसखोरी करण्याचा आणि त्याचप्रमाणे तेलविहिरींसारख्या अतिमहत्त्वाच्या सागरी आस्थापनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
देशभरात एकाच वेळेस हा प्रयत्न होणार असल्याने युद्धसदृश परिस्थिती हाताळण्याची आपली क्षमता नेमकी लक्षात येईल, अशी अपेक्षा आहे, असे जेओसीचे मुख्य अधिकारी कमांडर के. एस. बालाजी यांनी सांगितले. एरवीही केवळ मुंबई बंदरच नव्हे तर भारताच्या सागरी किनारपट्टीवर विविक्षित क्षेत्रामध्ये त्या त्या यंत्रणांची गस्त अहोरात्र सुरू असते. त्या यंत्रणांची प्रत्यक्ष परीक्षा बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या ऑपरेशन सी व्हिजिलसाठी भारतीय नौदलाच्या १३ युद्धनौका, २१ फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट, ६ तात्काळ मदतनौका तर तटरक्षक दलाच्या ११ गस्तीनौका, २२ अटकावनौका, नौदलाची ९ तर तटरक्षक दलाची ७ गस्तीविमाने आणि हेलिकॉप्टर्स सहभागी झाली असून त्याशिवाय सागरी पोलिसांच्या ७२ गस्तीनौकाही या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत.