Video : पंजाबमधील लुधीयाना येथे बुधवारी एका दाम्पत्याला ८५ वर्षीय आईला मारहाण तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या बहि‍णीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार पहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायकोट शहरातील मोहल्ला बँक कॉलनी येथे ही घटना घडली.

या वृद्ध महिलेचे नाव गुरनाम कौर असून त्या त्यांचा मुलगा जसवीर सिंग आणि सून गुरप्रीत कौर यांच्याबरोबर राहतात. मात्र १ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी त्यांची मुलगी गुरप्रीत कौर यांना त्यांचा भाऊ आईला मारहाण करत असल्याचे आढळून आले. हरप्रीत यांना त्यांच्या फोनशी कनेक्टेड असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा भाऊ आईला मारहाण करत असल्याचे पाहीले आणि हे प्रकरण उजेडात आले.

२८ मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कथितपणे एका पलंगावर बसलेल्या महिलेला तिचा मुलगा चापटा मारत असल्याचे दिसून येत आहे. य़ा व्हिडीओमध्ये तो त्याच्या आईचा गळा दाबण्याचाही प्रयत्न करतानाही दिसत आहे. जेव्हा ती महिला बेशुद्ध पडते तेव्हा तो तिला फरपटत घेऊन जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या प्रकाराने संतापलेल्या हरप्रीत यांनी हा व्हिडीओ ‘मनुक्ता दि सेवा’ या एनजीओजचे चेअरमन गुरूप्रीत सिंग उर्फ मिंटू यांना पाठवला. गुरूप्रीत सिंग आणि त्यांची टीम गुरनाम यांच्या घरी पोहचली आणि त्यांची सोडवणूक केली. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

रायकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि एसचओ अमरजित सिंग यांनी सांगितले की, रुग्णालयाकडून वृद्ध महिलेला झालेल्या जखमांचा रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला आहे. एफआयआरनुसार, पीडित महिलेने सांगितले की त्यांचा मुलगा आणि सुनेकडून त्यांच्यावर खूप अत्याचार केले जात आहेत.

वृद्ध महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तिच्या सुनेच्या सांगण्यावरून तिचा मुलगा तिला सतत मारहाण करत असे. २८ मार्च रोजीही तिच्या सुनेनं तिच्या मुलाला तिला थप्पड मारण्यास भडकावले. त्यानंतर त्याने तिचे डोके भिंतीवर अनेक वेळा आपटले आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जसवीर आणि गुनप्रीत यांना अटक केली असून त्यांच्यावर ११५(२). २९६, ३५१ (१). ३५१(३) आणि ३ (५) या भारतीय न्याय संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.