राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशाच्या शामली येथील एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे. सतेंद्र सिंह आणि कविता देवी असे या दोघांची नावे आहेत. दोघांनी राहत्या घरावरील कौलं झाकण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला होता. हे दोघे राष्ट्रध्वजाने घरावरील कौलं झाकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच कांढला पोलीस ठाण्याचे एसएचओ श्यामवीर सिंह यांनी गुन्हा दाखल करत, दोघांना अटक केली. तसेच त्यांना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
हेही वाचा – VIDEO : बंगळुरूला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपलं; शहरातील अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती
दरम्यान, “आम्ही केवळ थंडीपासून बचाव करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करत होतो. यामुळे आम्हाला तुरुंगात जावे लागेल याची कल्पनाही नव्हती. राष्ट्रध्वजाचा अनादर करणे हा आमचा हेतू नव्हता”, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्याने दिली.