उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका जोडप्याला शेजाऱ्यांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या दुर्दैवी घटनेत जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत जोडप्याच्या मुलाचं शेजाऱ्याच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, याच कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.
सीतापूरचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितलं की, अब्बास आणि त्यांची पत्नी कमरूल निशा हे हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेपूर गावातील रहिवासी आहेत. शुक्रवारी सायंकाळी मृत दाम्पत्याच्या शेजारील घरातील काही सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
हेही वाचा- VIDEO: घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न, ६ जणांना अटक
या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मिश्रा यांनी पुढे सांगितले की, काही वर्षांपूर्वी अब्बास यांचा मुलगा शेजारच्या मुलीबरोबर पळून गेला होता. याप्रकरणी अब्बास यांच्या मुलावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला तुरुंगवासही झाला होता.
हेही वाचा- मित्राच्या मृत्यूनंतर मुलीला बनवलं वासनेची शिकार, दिल्लीतील बड्या अधिकाऱ्याचं विकृत कृत्य
पण अलीकडेच मृत अब्बास यांच्या मुलाची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर शेजारच्या कुटुंबातील काही सदस्यांनी या दाम्पत्यावर हल्ला करण्याची योजना आखली आणि शुक्रवारी सायंकाळी हा हल्ला केला. याप्रकरणी आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.