कर्नाटकातील कोडागु येथील एका रिसॉर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रिसॉर्टमध्ये फिरायला आलेल्या तिघांचा मृतदेह खोलीत आढळून आला. या मृतांमध्ये ११ वर्षांच्या मुलीसह तिच्या आई-वडिलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ धाव घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी असलेले विनोद (४३), पत्नी झुबी अब्राहम (३७) आणि मुलगी जोहान (११) हे कोडागू येथील एका रिसॉर्टमध्ये फिरण्याकरता आले होते. या कुटुंबाने शनिवारी जंगल आणि डोंगराळ प्रदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिसॉर्टमध्ये चेक इन केले. परंतु, त्यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं. कारण, त्यांना या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आधी आपल्या ११ वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर, दोघांनी आत्महत्या केली. तसंच, सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेचं कारण दिलं आहे. ते अत्यंत आर्थिक अडचणींचा सामना करत होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून पुढील अधिक चौकशी सुरू केली आहे.