Crime News : राजस्थानच्या जोधपूर येथे एका गावात दाम्पत्याने तीन मुलांचा निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलांना आधी विष दिलं नंतर त्यांचा गळा आवळला. इतक्यावर ते थांबले नाहीत पुढे त्यांनी मनगट आणि गळा चिरून त्यांची हत्या केली. मुलांची हत्या केल्यानंतर या दोघांनी स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जोधपूर जिल्ह्यातील फलोदी तहसीलमधील कोलू पाबुजी या गावात सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला असे पोलिसांनी सांगितले. जोडप्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी घराच्या अंगणात रक्त साचलेले पाहिले आणि याबद्दल पोलिसांना कळवले, त्यानंतर हा भयानक प्रकार उजेडात आला.

या पाचही जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तीनही मुलांना येथे मृत घोषित करण्यात आले. तर त्यांच्या आई-वडीलांवर उपचार केले जात आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

नेमकं काय झालं?

फलोदीच्या पोलिस अधीक्षक (एसपी) पूजा अवाना म्हणाल्या की, शिवलाल आणि त्यांची पत्नी जातनो देवो यांच्यात सोमवारी रात्री वाद झाला होता, ज्यामधून त्यांनी हे भयानक कृत्य केले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, या जोडप्याने पहिल्यांदा त्यांचा मुलगा हरीश (९) आणि मुली किरण (५) आणि नथ्थू (३) यांना विष पाजले आणि नंतर त्यांचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मुलांच्या हाताच्या नसा ब्लेडने कापल्या आणि चाकूने त्यांचा गळा कापला. त्यानंतर, या जोडप्याने स्वत:ची मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

एसपी अवाना म्हणाल्या. की शिवलाल यांच्या भावाच्या पत्नीला मंगळवारी सकाळी त्यांच्या घराच्या बाहेर रक्त दिसलं आणि त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना याबद्दल सांगितले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना आरोपी पती आणि पत्नी हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या घराचे अंगण हे रक्ताने भिजलेले होते, असेही त्यांनी सांगितेल. पोलिसांन विषाची रिकामी बाटली, ब्लेड आणि एक चाकू घरातून जप्त केला आहे.

या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेतली जात असल्याचे एसपींनी सांगितले. तसेच कुटुंबातील इतरांची देखील चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या जोडप्याचा जबाब घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत असेही पोलिसांनी सांगितले.