आजकाल सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम या तिन्हीकडे पाहातही नाही असा माणूस विरळच. या सगळ्याचे घातक परिणामही दिसू लागले आहेत. एका जोडप्याने इन्स्टाग्रामवर रिल तयार करण्यासाठी आयफोन १४ विकत घेण्यासाठी आठ महिन्यांच्या बाळाला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातली ही घटना आहे. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या दोघांनी त्यांचं बाळ विकलं. त्यानंतर त्यांनी बाळ हरवल्याचा बहाणा केला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख किंवा अस्वस्थता जाणवली नाही. त्यामुळे या दोघांच्याही शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या वागणुकीचा संशय आला. ज्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली. आठ महिन्यांच्या या बाळाच्या आईचं नाव साथी असं आहे. तर या बाळाचे वडील जयदेव घोष फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शेजाऱ्यांचा संशय या दोघांवर बळावण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे या दोघांनी अचानक आयफोन १४ खरेदी केला. या फोनची किंमत १ लाखापेक्षा कमी नाही. आर्थिक अडचणी सहन करणाऱ्या या दोघांनी आयफोन १४ कसा काय घेतला? याचाही संशय शेजाऱ्यांना आला. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
शेजाऱ्यांनी या दोघांची चौकशी केली. खोदून खोदून विचारल्यानंतर बाळाच्या आईने हे कबूल केलं तिच्या पतीने आयफोन खरेदी करण्यासाठी पैसे गोळा केले होते. इन्स्टाग्रामवर विविध राज्यांच्या भागांमध्ये प्रवास करुन आम्ही रिल्स करणार होतो असंही बाळाच्या आईने म्हणजेच साथीने सांगितलं. पोलिसांनी जेव्हा साथीला ताब्यात घेतलं तेव्हा तिने बाळ विकल्याचं मान्य केलं. तसंच काही दिवसांपूर्वी सात वर्षांच्या मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला होता हे देखील सांगितलं. पोलिसांनी या दोघांविरोधात आणि त्यांचं बाळ विकत घेणाऱ्या महिलेच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. लवकरच आम्ही या बाळाच्या वडिलांनाही अटक करु असंही पोलिसांनी म्हटलं आहे.