पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने सार्वजनिकरित्या ही मारहाण केल्याचा दावा केला जातोय. आजूबाजूला जवळपास २०० लोकांचा जमाव होता. या जमावासमोर एका पुरुषाला आणि महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारण्यात आलं. यावरून भाजपाने आणि सीपीआय या पक्षांनी तृणमूलवर निशाणा साधला आहे. तर हा प्रकार समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.
२८ जून रोजी पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे साळिशी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत या दोघांच्या विवाह्यबाह्य संबंधाविषयी चर्चा सुरू होती. याचवेळी या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ताजिमूल इस्लाम असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. हा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याला परिसरात जेसीबी म्हणूनही ओळखलं जातं.मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ताजिमूल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार, आजूबाजूला घोळका जमला आहे. घोळक्याच्या मधे या जोडप्याला एक काळा टीशर्ट घातलेली व्यक्ती बेदम मारहाण करत आहे.
या प्रकरणातील पीडित इतके घाबरले होते, की त्यांनी स्वतःहून पोलीस तक्रार करणं टाळलं. परंतु, सोशल मीडियावरील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. तर, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी टीएमसीवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा >> फौजदारी न्याय प्रक्रियेत भारताचे पथदर्शी पाऊल; केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे प्रतिपादन
“बंगालमध्ये तालिबान राजवट निर्माण झाली असून टीएमसीच्या एका कार्यकर्त्याने एका पुरुष आणि महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण करणारा व्यक्ती हा टीएमसी आमदाराचा समर्थक आहे. याप्रकरणात प्रशासन आणि पोलीस कुठेच दिसत नाहीत”, अशी टीका केंद्रातील राज्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी केले. इंडियन एक्स्प्रेसशी ते बोलत होते.
या मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही
दरम्यान, विरोधकांच्या आरोपांवर टीएमसीनेही उत्तर दिलं आहे. टीएमसीचे जिल्हाध्यक्ष कनय्यालाल अग्रवाल म्हणाले की, “मारहाण करण्यात आलेल्या स्त्री आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होतं. म्हणून साळिशी सभा घेण्यात आली होती. परंतु, ताजिमुलने जे केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत.”
आरोपीचा पक्षाशी काहीही संबंध नाही
तर टीएमसी आमदार हमीदूल रहमान म्हणाले, “व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा पक्षाशी काहीच संबंध नाही. त्याच्याकडे पक्षातील कोणतंही खातं नाही. चोप्रातील प्रत्येकजण तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे.”
तर इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हमीदूल रहमान म्हणाले की, “या प्रकरणातील महिलेने दृष्ट काम केले आहे. तिचं कृत्य असामाजिक आहे. या महिलेला पती आणि मुलं असतानाही तिने दुष्ट काम केले. मुस्लिम समाजात काही नियम आणि कायदे आहेत. मात्र, येथे जे झालं ते जरा अतीच झालं”, असंही ते म्हणाले.