Hyderabad Horror : हैदराबादच्या हबसीगुडा भागात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा त्यांच्या घरात मृतदेह आढळून आला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने, आरोग्य समस्या निर्माण झाल्याने आणि बेरोजगारी असल्याने यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कोठा चंद्रशेखर रेड्डी (४४), त्यांची पत्नी कविता (३५), त्यांची मुले श्रीथा रेड्डी (१३) आणि विशांत रेड्डी (१०) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व हबसीगुडा येथील रवींद्रनगर येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी एका खाजगी महाविद्यालयात ज्युनियर लेक्चरर म्हणून काम करत होते. परंतु, २०२३ पासून बेरोजगार होते. पोलिसांना घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. “दीर्घकाळ बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्यांमुळे कुटुंबाच्या आर्थिक तणावात वाढ झाली आहे. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे”, असं पोलीस म्हणाले. या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंची तपासणी केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आत्महत्येच्या चिठ्ठीत काय लिहिलं?

या जोडप्याने तेलुगू भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, संघर्षमय करिअर आणि मानसिक आणि शारिराक आरोग्य समस्यांमुळे त्यांच्याकडे जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तसंच, मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही.

चंद्रशेखर रेड्डी यांचे मोठे भाऊ कोठा उपेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते आणि उर्वरित चार भाऊ त्यांना नियमितपणे मदत करत होते. चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी सोमवारी रेड्डी यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि आत जाऊन चौघेही मृतावस्थेत आढळले. उपेंद्र रेड्डी यांनी पुढे सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे त्यांचा भाऊ मानसिकदृष्ट्या निराश होता. उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

Story img Loader